Sunday, January 27, 2019

Nostalgia

वाडा म्हणजे खरतर माझं आजोळ पण मी ते कधीच पाहिलं नाही. एकदा धरणाचं पाणी बघायला गेल्यावर आईने मला सांगितलं 'हे बघ, इथे आपलं गाव होतं, आणि तो डोंगर आहे नं, तिकडे महादेवाचं मंदिर. बाबाकाका त्याची रोज पूजा करायचा.' असं म्हणून ती तिच्या आठवणींमध्ये रंगून गेली. इतकाच माझा वाडयाशी संबंध. पण मला तिथल्या गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. पणजीआजीच्या रांगोळीची गोष्टं तर खूपच. ओसरीच्या बाहेर पायरया उतरून अंगणात आलं की समोर मुख्य दरवाज्यावरच्या जाई- जुईचा मंद सुगंध. त्यात पणजी आजी नुकतीच न्हाऊन येऊन सडा शिंपडायची तो संमिश्रित वास. ठिपक्यांच्या रांगोळीचा इतका संग्रह तिच्या डोक्यात असायचा की कधीच तिला एक रांगोळी पुन्हा काढावी लागली नाही. मी पणजीला ठिपक्यांची रांगोळी काढताना पहिलं नाही पण आजही आईला घरासमोर रांगोळी काढताना बघितलं की स्वच्छ नववारी मध्ये डोक्याला पंचा गुंडाळून प्रशस्त अंगणात स्तोत्र गुणगुणत पाठमोरं बसून रांगोळी काढणाऱ्या पणजीचं चित्र इतकं टवटवीत माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं की खरचं तिच्या मागे पारिजातकाची फुलं वेचत मी हे सगळ अनुभवलंय असं वाटावं.

No comments:

Post a Comment